देशभरात आज दिवाळी सण उत्साहात साजरा होत असताना संरक्षमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या घरापासून दूर अंदमान-निकोबार येथे लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.


सीतारामन यांचे येथे बुधवारीच आगमन झाले होते. यावेळी त्यांनी अंदमान आणि निकोबार या हिंदी महासागरातील भारतीय बेटांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्याचबरोबर येथील लष्करी यंत्रणांची माहितीही घेतली. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी २००४ मध्ये आलेल्या सुनामीत मृत्यू पावलेल्या हवाई दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली वाहिली.


सीतारामन यांनी अंदमान-निकोबार कमांड अंतर्गत येणाऱ्या नौदल आणि तटरक्षकदलाच्या तळांनाही भेटी दिल्या. याची माहिती त्यांनी ट्विटकरुन दिली आहे. संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच त्यांनी सामरिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या या कमांडला भेट दिली.


ज्यावेळी सीतारामन यांचे येथे आगमन झाले तेव्हा त्यांना तिन्ही सेवादलांकडून संयुक्त गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांनतर त्यांनी जवानांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेबाबत संबोधित केले. व कमांड मुख्यालयाची माहिती घेतली, अशी माहिती संरक्षणदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.