लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आश्वासन देऊनही बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिल्याबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
बिहारशी करण्यात आलेली प्रतारणा जनतेने समजून घ्यावी, बिहारच्या जनतेची ही क्रूर थट्टा आहे, असे नितीशकुमार यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
कोणत्याही राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आलेला नाही, विशेष पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली आहे, असे निवेदन ३१ जुलै रोजी केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह यांनी लोकसभेत केले त्याबद्दल नितीशकुमार बोलत होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर बिहारला विशेष दर्जा दिला जाईल, विशेष पॅकेज दिले जाईल आणि बिहारकडे विशेष लक्ष पुरविले जाईल, असे मोदी यांनी प्रचाराच्या भाषणांत सातत्याने सांगितले होते त्याची फीत सतत प्रसारित केली जाईल, असेही नितीशकुमार म्हणाले.