जमीन अधिग्रहण विधेयकातील तरतुदी समजून न घेता केवळ ‘पर्सेप्शन’च्या भरवशावर विरोध करणारे शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचा आरोप केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर केला.
   जे विरोधक जमीन अधिग्रहण कायदा शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत आहेत, त्यांनी रुग्णालय, ग्रामीण विकास, रस्ता, रेल्वे आदी मुद्दय़ांवरही आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांनी केवळ विरोध करण्याऐवजी आमच्याशी चर्चा करावी. चांगल्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करू, असे गडकरी म्हणाले.  
  शेतकऱ्यांच्या हिताच्या बाता मारणाऱ्या काँग्रेसच्याच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास विरोध केला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  व हरयाणाचेही माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्यास नकार दिला होता, असा गौप्यस्फोट करीत गडकरी यांनी विरोधकांना कोंडीत पकडले. चव्हाण यांनी केंद्र सरकारला लिहिलेले पत्र गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. विरोधक सभागृहात, मंत्र्यांशी चर्चा करताना, प्रसारमाध्यमांसमोर वेगवेगळी भूमिका मांडतात. त्यामुळे त्यांची अवस्था झोपेचे सोंग घेतलेल्यांसारखी आहे. त्याउपरही विरोधकांनी चांगल्या सुधारणा सुचवल्यास आम्ही जरूर विचार करू, असे गडकरी म्हणाले.