हिंदूंना चार मुले असावीत वगैरे मुक्ताफळे उधळून भाजप खासदारांनी पंतप्रधान मोदी यांना जेरीस आणले असतानाच आता त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या रामभक्तांचे आता देशात सरकार असून लवकरच राम वनगमन मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जाईल, असे गडकरी यांनी जाहीर केले आहे. ‘रामभक्तांचे सरकार’ या त्यांच्या वक्तव्यामुळे गडकरी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर यांना जोडणारा राम-जानकी मार्ग तयार करण्याची घोषणा केली होती. फैजाबादचे खासदार लल्लूसिंह यांनी अयोध्या ते मध्य प्रदेशातील चित्रकूट असा राम वनगमन मार्ग कधी होईल याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावर गडकरी यांनी वरील वक्तव्य केले. गडकरी यांच्या या वक्तव्यावर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.