केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हेलिकॉप्टर येथे उतरत असताना त्यांच्या स्वागतासाठी घालण्यात आलेल्या लाल गालिच्याचा तुकडा हवेत उडून तो हलिकॉप्टरच्या पात्यात अडकला, मात्र गडकरी संभाव्य दुर्घटनेतून सुदैवाने बचावले.
दौऱ्यावर येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठी लाल गालिचा नेहमीच अंथरण्यात येतो. गडकरी यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असताना रोटरमधून आलेल्या जोराच्या वाऱ्याने गालिच्याचा तुकडा हवेत उडाला आणि तो पात्यात अडकला. गडकरी यांच्या व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नव्हती. त्याचप्रमाणे वैमानिकानेही दुसऱ्या मार्गाने हेलिकॉप्टर आणले नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले. गालिचा अथवा झेंडे विमान उतरण्याच्या ठिकाणी लावण्यात येऊ नयेत, असे गडकरी म्हणाले. हेलिकॉप्टर उतरत असताना तेथील गालिचा वाऱ्याने उडू लागला, असे दृश्य विविध वाहिन्यांवरून प्रसारित केले जात होते.