केंद्रीय मंत्री गडकरींची टिप्पणी; राज्यात परतण्याचे दरवाजे कायमचे बंद केल्याची स्पष्टोक्ती

मी आता दिल्लीतच रमलोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात परतण्याचे दरवाजे मी स्वतहून कायमचेच बंद केल्याचे पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपण आता दिल्लीतील महाराष्ट्राचे दूत बनलो असल्याची टिप्पणी शुक्रवारी केली.

मी नाईलाजानेच राष्ट्रीय राजकारणात आलो. पण सात-आठ वर्षांनंतर मी आता दिल्लीचाच बनलोय. मी स्वप्नाळू आणि ध्येयवादी आहे. महाराष्ट्रात मंत्री असताना एक द्रुतगती मार्ग बनविला होता; पण आता संपूर्ण देशात तसे बारा मार्ग बनविण्याचे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी झोकून दिलंय. गेल्या पन्नास वर्षांत जेवढे काम झाले नाही, तेवढे काम पाच-सहा वर्षांत करण्याची जिद्द बाळगलीय. मग राज्यात परतण्याचे प्रयोजन काय?असा उलट सवाल करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर कौतुकाची थाप टाकली.

फडणवीस सरकार चांगले काम करतंय. सुरुवातीला मंत्री नवे होते, फारसा अनुभव नव्हता. पण आता जम बसलाय. कामांचा वेग वाढलाय. रस्ते, वीज, शेतीमधील निरंतर प्रयत्न, कृषिकर्जमाफी यासारखे निर्णय झालेत. सरकारवर भ्रष्टाचाराचा मोठा डाग नाही. राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना सवर्तोपरी मदत करण्यासाठी मी दिल्लीत आहेच. त्या अर्थाने मी राज्याचा राजधानीतील दूत आहे अशी पुस्तीही जोडली. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकीची कितपत शक्यता आहे, या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. मुख्यमंत्रीच अधिक काही सांगू शकतील, एवढेच तुटक उत्तर त्यांनी दिले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाच्या चच्रेवरही त्यांनी बोलण्यास नकार दिला. शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले; पण सत्तेमध्ये असताना जबाबदारीने वागण्याची आणि बोलण्याची गरज असल्याचा टोला मारला.