बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आपण सात जन्म माफ करणार नाही, असे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव म्हटले आहे. सोमवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नितीश हे मोठे डरपोक व्यक्ती असल्याचे म्हणत त्यांनी संभावना केली. सृजन घोटाळ्यामध्ये नाव आल्याने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जप करीत असल्याचा आरोपही लालू यांनी केला.

पाटणा येथे रविवारी एका कार्यक्रमात बोलताना नितीशकुमार म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाडसी आणि कडक पावले उचलणारे व्यक्ती आहेत. यावरुन लालूप्रसाद यादव यांनी नितीश यांच्यावर सोमवारी निशाना साधला. सृजन घोटाळ्याच्या भीतीने नितीशकुमार मोदी आणि भाजपचा जप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पाटणा येथे परतल्यानंतर लालूप्रसाद यादव पत्रकार परिषदेत बोलत होते. नितीशकुमार यांच्यावरील रागाचे कारण सांगताना ते म्हणाले, लालूंसोबत सत्तेत असताना दोन वेळेस नितीशकुमार मुख्यमंत्री बनले. मात्र, असे असतानाही ते भाजपसोबत गेले. भाजप नितीशकुमार यांचा वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, लालूप्रसाद यांदव यांच्या या वक्तव्यावर नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, लालूंच्या बाष्कळ बडबडीला आम्ही कुठलेही उत्तर देणार नाही. लालूप्रसाद यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपांची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. जेव्हापासून नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून राजद आणि जदयू यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.