बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यांच्यावर जोरदार टीका केली होती… ज्यांच्यामुळे बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजपमधील युती संपुष्टात आली… त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नितीशकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामानंतर जवळपास वर्षभरानी नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले.
बिहारला अधिकाधिक निधी देण्याची मागणी यावेळी त्यांनी मोदी यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बिहारची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मदत केली पाहिजे, अशी मागणी नितीशकुमार यांनी मोदींकडे केली. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर जनता दल युनायटेडने त्या पक्षासोबतची १७ वर्षांची युती तोडली होती.