लालूंना सोडचिठ्ठी; भाजपच्या पाठिंब्यावर आज पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांचे ओझे अखेर भिरकावून देताना संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नितीशकुमारांच्या या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मिनिटांमध्येच स्वागत केल्याने आणि नितीशकुमारांनी त्याबद्दल मनोमन आभार मानल्याने भाजप त्यांना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्टच झाले. तशी घोषणा रात्री उशिरा बिहार भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी पाटण्यामध्ये केली. या सगळ्या नाटय़पूर्ण घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या पाठिंब्यावर नितीशकुमार हे आज, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, सुशीलकुमार मोदी हे त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत!

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्विनी यादव यांच्याशी नितीश यांचे संबंध गेल्या महिनाभरात कमालीचे ताणले गेले होते. त्या पाश्र्वभूमीवर बुधवारी संयुक्त जनता दलाच्या आमदारांच्या बैठकीत नितीश यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. बैठक संपल्यानंतर नितीशकुमारांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि लगेचच राजभवनात जाऊन राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे तो सूपूर्द केला. या घटनेने राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला. आपल्या राजीनाम्याची कारणे पत्रकारांसमोर उघड करताना नितीश यांनी लालू यादव यांच्या कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला.

नोटाबंदीला, बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याला मी पाठिंबा दिला होता. मग तेजस्वी व लालूंच्या कुटुंबीयांवरील बेनामी मालमत्तांप्रकरणी मी कसा गप्प राहू?, असा प्रश्न नितीशकुमार यांनी केला. ‘मी काही तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितला नव्हता. मी फक्त स्पष्टीकरण मागितले होते. ते ही मला मिळाले नाही. मग माझ्यासमोर पर्याय राहिला नाही. महाआघाडी टिकविण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. (त्यांनी) माझ्यावर तथ्यहीन आरोप केले, पण मी राज्यासाठी काम करीत राहिलो. असल्या वातावरणात काम करणे मला अशक्य होते. त्यामुळे महाआघाडीतून बाजूला होण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. मग माझ्या अंतरात्म्याने दिलेल्या आवाज ऐकून मी निर्णय घेतला आणि राजीनामा दिला.’

पाटण्यात हे नाटय़ सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निर्णयाचे तत्काळ स्वागत केले. ‘भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही उचललेल्या पावलांचे देशातील सव्वाशे कोटी जनता स्वागत करीत आहे. हा निर्णय बिहार आणि देशासाठीही महत्वाचा आहे,’ असे सांगत मोदींनी या ‘पक्षविरहित’ निर्णयाबद्दल नितीशकुमारांचे कौतुक केले. मोदींच्या या वेगवान प्रतिक्रियेला नितीशकुमारांनीही लगोलगच ‘मनोमन’ प्रतिसाद दिला आणि एका अर्थाने भाजपबरोबरील युतीचे संकेतही देऊन टाकले.

योगायोगाने बुधवारी सायंकाळीच भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होती. बिहारमध्ये मुदतपूर्व निवडणुका नको, असा ठराव मोदींच्या उपस्थितीत त्या बैठकीत झाला आणि बिहारचे नेते सुशीलकुमार मोदी, बिहारचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय आणि प्रेमकुमार या तीन नेत्यांची समिती नेमण्याचा निर्णय झाला. पण त्याचवेळी पाटण्यामध्ये भाजपच्या आमदारांच्या बैठकीनंतर सुशीलकुमार मोदींनी पाठिंब्याची अधिकृत घोषणाच केली. पाठिंब्याचा निर्णय आम्ही लवकरच राज्यपालांना कळविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाश्र्वभूमी..

लालूपुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, कन्या व खासदार मिसा भारती यांच्या नावावरील सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तांप्रकरणी सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी छापासत्र सुरू केल्यापासून नितीशकुमार व लालूंमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. या संदर्भात यादव कुटुंबाने खुलासा करावा, अशी भूमिका नितीशकुमार वारंवार मांडत होते. भ्रष्टाचारमुक्त बिहारचा वायदा करणारे नितीश यांना भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या यादव कुटुंबाची साथ कायम ठेवणे कमालीचे अडचणीचे होऊन बसले होते.

भ्रष्टाचारविरोधी लढाईत सामील झाल्याबद्दल नितीश कुमार यांचे खूप खूप अभिनंदन. सव्वाशे कोटी जनता तुमच्या प्रामाणिकपणाचे स्वागत आणि समर्थन करीत आहे.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

१९९१मधील खूनप्रकरणात तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने नितीशकुमारांनी प्रामाणिकतेचे ढोंग करून राजीनामा दिलाय. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर हातमिळवणी करून जनादेशाचा अपमान केला. पण माझा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष आहे. सत्तास्थापनेचा पहिला अधिकार मलाच आहे.. – लालूप्रसाद यादव (नितीश यांच्या नाटय़मय घोषणेनंतर)

प्रत्येकाची गरज भागविण्याइतपत पृथ्वीमातेकडे आहे, पण एखाद्याची हाव मात्र कधीच पूर्ण होऊ  शकत नाही, असे महात्मा गांधी म्हणत. ते खरेच आहे. बिहारमध्ये ते पाहतो आहे. आता हे सगळे सहन होत नाही..   – नितीशकुमार