राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांकडून लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमूख लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मीरा कुमार यांना पाठिंबा देण्याचे अपील केले आहे. मीरा या बिहारच्या कन्या आहेत, असे म्हणत नितीश हे ऐतिहासिक चूक करत आहेत. लालू यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधत पाठिंब्याचा निर्णय सज्जनता किंवा दुर्जनतेच्या आधारावर नव्हे तर विचारधारेवर केला जातो, असा टोला लगावला.

१७ विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना लालू यांनी अप्रत्यक्षरित्या नितीश कुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, तुम्हाला लक्षात असेल की, राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी सर्वांचे जे मत असेल त्याला आम्ही साथ देऊ असे नितीश कुमार यांच्या पक्षाचेच शरद यादव यांनी म्हटले होते. त्यानंतर दोन बैठकाही झाल्या. मध्येच काय झालं काय माहीत असा, प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नितीश कुमार यांच्या रामनाथ कोविंद यांना समर्थन करण्यामागच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. नितीशजी म्हणाले की, ते खूप सज्जन आणि चांगले राज्यपाल आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तीची सुंदरता, सज्जनता किंवा दुर्जनतेवर निर्णय घेतला जात नाही. आम्ही विचारधारेशी समजोता करू शकणार नाही. काँग्रेसने जरी भाजपला पाठिंबा द्या, असे म्हटले असते तरी आम्ही असं केलं नसतं, असे त्यांनी ठासून सांगितले.

नितीश कुमार यांनी सांगितलं की, हा वैयक्तिक निर्णय आहे. मी त्यांना यावर पुर्नविचार करण्याचे आवाहन करतो. आपल्या आघाडीत फूट पडू नका, असे त्यांनी या वेळी म्हटले.