काही तांत्रिक कारणास्तव बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी जनता परिवाराचे विलीनीकरण शक्य नाही, असे वक्तव्य करून सपाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी संभ्रमाचे वातावरण निर्माण केले असले तरी विलीनीकरणाचा अध्याय अद्याप संपलेला नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
या प्रश्नावर चर्चेला पूर्णविराम मिळावा आणि वातावरण मोकळे व्हावे यासाठी विलीनीकरण समितीची लवकरच बैठक आयोजित करावी, अशी सूचना आपण सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांना करणार असल्याचे नितीशकुमार म्हणाले. विलीनीकरणाच्या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तथापि, भविष्यात कोणती तांत्रिक अडचणी निर्माण झालीच तर सहा सदस्यांच्या समितीमध्ये चर्चा करून ती सोडविली जाईल, असेही नितीशकुमार म्हणाले. सपा, जद(यू), राजद, जद (एस), आयएनएलडी आणि एसजेपी या पक्षांचे विलीनीकरण होणार असून रामगोपाल यादव आणि लालूप्रसाद यादव समितीचे सदस्य आहेत.

भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मान्य – पासवान
पाटणा: बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या मतपेढीला गळती लागली असून विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला दोनतृतीयांश बहुमत मिळून त्यांचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी व्यक्त केला. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा आम्ही स्वीकार करू, असेही ते म्हणाले.जितनराम मांझी यांच्या बंडखोरीमुळे जद(यू)च्या आणि पप्पू यादव यांच्या बंडखोरीमुळे राजदच्या व्होट बँकेला गळती लागली आहे. एनडीची व्होट बँक  एकत्रित असल्याचा दावा केला.