राष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर १७ पक्ष एका व्यासपीठावर; बीजेडी, अण्णाद्रमुकची अनुपस्थिती लक्षणीय

एकीकडे नरेंद्र मोदी सरकार आपली तीन वर्षे साजरी करत असतानाच दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १७ विरोधी पक्षांना एकत्र आणून महाआघाडीच्या दिशेने पावले टाकण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. मात्र, या बैठकीत राष्ट्रपतिपदासंदर्भात काही ठोस चर्चा झाली नसल्याचे समजते.

या बैठकीस काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, बसपाच्या मायावती, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येच्युरी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, द्रमुकच्या कनिमोळी यांच्यासह सतरा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, त्याच वेळी बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरविली. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादवसुद्धा बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थित रामगोपाल यादव यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय आम आदमी पक्षाला निमंत्रणच देण्यात आले नव्हते.

या बैठकीनंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी छोटेखानी निवेदन केले. ‘राष्ट्रपतिपदासाठी सहमती होण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. जर सरकारने सहमतीसाठी प्रयत्न केले नाहीत आणि सर्वमान्य असा उमेदवार दिला नाही तर सर्व विरोधकांकडून राज्यघटनेवर अतूट श्रद्धा असलेल्या उमेदवाराला उभे केले जाईल,’ असे निवेदनात म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर उमेदवारावर विरोधकांमध्ये सहमती झाली नाही तर एखादी छोटी समिती स्थापन केली जाईल.

या बैठकीमध्ये काश्मीरमधील आणि उत्तर प्रदेशातील दलितांविरुद्धच्या दंगलींबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. संसद अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याचाही निर्णय झाला.

नितीशकुमारांची दांडी; पण आज मोदींसोबत!

सर्व विरोधी पक्षांच्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी मारलेल्या दांडीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. सोनिया गांधी यांच्या बैठकीला स्वत: न येता त्यांनी शरद यादव व के.सी. त्यागी या आपल्या दोन नेत्यांना पाठविले. पण एकीकडे विरोधकांच्या बैठकीला दांडी मारणारे नितीशकुमार आज (शनिवार) मालदीवचे पंतप्रधान प्रवींद जुगनौथ यांच्या स्वागतसमारंभाच्या मेजवानीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सहभागी होणार आहेत. नितीशकुमारांच्या या निवडीने भाजपबरोबरील त्यांच्या कथित जवळिकीबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे.