पदभार स्वीकारल्यानंतर नितीशकुमार यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी शनिवारी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या प्रश्नावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नितीशकुमार यांनी पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आदेश दिले. कोणत्याही स्थितीत राज्यातील गुन्हेगारीला वेसण घालण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे नितीशकुमार यांनी वार्ताहरांना सांगितले.
जद(यू)ने राजदसमवेत आघाडी केल्याने बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज येईल, असा हल्ला विरोधकांनी चढविल्याने नितीशकुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्वप्रथम बैठक घेतली.
जातीय तणावाचे प्रकार घडल्यास जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही या वेळी नितीशकुमार यांनी दिला.