नितीश कुमार उद्या (गुरुवारी) संध्याकाळी ५ वाजता बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर लालू प्रसाद यांनी त्यांच्यावर बेछूट आरोप केले, तर भाजपच्या दिल्लीपासून ते बिहारपर्यंतच्या सर्व नेत्यांनी नितीश यांना पाठिंबा दर्शवला. याच पार्श्वभूमीवर उद्या नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

बुधवारपर्यंत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या महाआघाडीचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार गुरुवारपासून एनडीएचे मुख्यमंत्री होणार आहेत. नितीश कुमार गुरुवारी संध्याकाळी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत भाजपचे १४ आमदारदेखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपचे बिहारमधील वरिष्ठ नेते सुशील मोदी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधीही त्यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.

बुधवारचा दिवस बिहारच्या राजकारणात अतिशय वेगवान घडामोडींचा ठरला. संध्याकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन राजीनामा दिला. पक्षाच्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपर्द केला आणि लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन शरसंधान साधले. यानंतर दिल्ली आणि बिहारमध्ये वेगाने घडामोडी घडल्या. भाजपने नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बुधवारी मुख्यमंत्रीपद सोडलेले नितीश कुमार गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर नितीश कुमार लालू प्रसाद यादव आणि कुटुंबीयांवर बरसले. यानंतर लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यामध्ये नितीश कुमार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे आणि त्यामुळेच ते भाजपशी सेटिंग करत असल्याचा घणाघाती आरोपदेखील लालू प्रसाद यादव यांनी केली. मात्र दरम्यानच्या काळात भाजपच्या दिल्लीपासून ते बिहारपर्यंतच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना समर्थन देण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम ट्विटरवरुन नितीश कुमार यांच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. यानंतर नितीश कुमार यांनीदेखील ट्विटवरुन मोदींचे आभार मानले.

दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यावर बिहार भाजपकडून नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यानंतर नितीश कुमार यांच्या निवासस्थानी संयुक्त जनता दल आणि भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले.