जद(यू)चे नेते नितीशकुमार आणि बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या समर्थकांमधील शाब्दिक युद्धामुळे पक्षांतर्गत संघर्ष अधिकाधिक चिघळत चालला आहे. त्यामुळेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना गुप्त बैठक घेऊन हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करावा लागला आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ  नारायण सिंह आणि मांझी यांनी शनिवारी राज्य अतिथीगृहावर जवळपास अर्धा तास गोपनीय चर्चा केली. मांझी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षात कोणतीही समस्या नाही. वार्ताहरांनी याबाबत अधिक प्रश्न  विचारले असता त्यांनी, शरद यादव यांना विचारा, असे उत्तर दिले.
तथापि, नेत्यांच्या समर्थकांकडून होणाऱ्या शाब्दिक युद्धामुळे स्थिती गंभीर झाली असल्याचे वसिष्ठ नारायण सिंह यांनी सांगितले. नितीशकुमार यांच्या निवासस्थानाहून ते थेट अतिथीगृहावर आले होते. नेत्यांच्या विधानांमुळे पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असेही ते म्हणाले.
नितीशकुमार यांच्या गटातील जवळपास २०हून अधिक मंत्र्यांनी अन्नमंत्री श्याम रजक यांच्या निवासस्थानी प्रीतिभोजनाला हजेरी लावल्यापासून जद(यू)मधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मांझी यांच्याविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी आणि त्यांच्याऐवजी दलित नेते श्याम रजक यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी नितीशकुमार समर्थकांनी प्रीतिभोजन आयोजित केले होते, अशी चर्चा आहे.
या प्रीतिभोजनाच्या दुसऱ्याच दिवशी मांझी यांनीही पलटवार केला. नितीशकुमार यांच्या सरकारसह यापूर्वीच्या सरकारपेक्षा आपल्या सरकारची कामगिरी अधिक उत्तम आहे, असा दावा मांझी यांनी केला.