बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी सोमवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदासाठी राजदमध्ये कोणीही उत्सुक नसल्याचेही त्यांनी सांगितले. संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दल एकत्रिपणे निवडणूक लढवणार असल्याचे रविवारीच स्पष्ट करण्यात आले आहे. जागावाटपासाठी सहा जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष बिहारच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी एकत्र आले पाहिजे, हे ओळखूनच आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे लालूप्रसाद यादव म्हणाले.
गेले अनेक दिवस भेट टाळत असलेले लालूप्रसाद व नितीशकुमार मुलायमसिंह यांच्या निवाससस्थानी रविवारी बैठकीसाठी एकत्र आले होते. नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करावे, असा जनता दलाचा आग्रह होता. तर हा मुद्दा नंतर निकालात काढावा, अशी राष्ट्रीय जनता दलाची भूमिका होती. मात्र, सोमवारी एक पाऊल मागे घेत लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांना पाठिंबा जाहीर केला.