बिहार निवडणूकीत राष्ट्रीय जनता दल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू – राजदच्या महाआघाडीने विजयाचा बार उडवत भाजपाचा धूव्वा उडवला आहे.  या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू यांनी स्पष्ट केले. तसेच, बिहारमध्ये विरोधकांचा सुपडा साफ झाला या शब्दात लालूंनी भाजपवर निशाणा साधला. दिल्लीत भाजपला एका दिवसासाठीही सत्तेवर ठेवणे हे देशासाठी धोकादायक आहे. पुढे त्यांनी नितीश कुमारांना शुभेच्छा देत देशातील नरेंद्र मोदींना उखाडून फेकू असे म्हटले. आम्ही निवडणूकीच्या काळात दिलेली आश्वासनं आम्ही दोघे मिळून पूर्ण करू आणि बिहारला विकासाच्या वाटेवर नेऊ , असे आश्वासनही त्यांनी यावेळी जनतेला दिले. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास जलदगतीने करणार आहोत. युवा, शेतकरी, मजदूर, दलित यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल. महाआघाडीवर महिलांनी दाखविलेल्या विश्वासाला परिपूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. दहा दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मतदारसंघात कंदील घेऊन मोर्चा काढण्यात येईल.
बिहारमधील २४३ पैकी जदयू, राजद, काँग्रेस महाआघाडी १५७ जागांवर आघाडीवर असून भाजपाप्रणीत रालोआ ७६ जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य पक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत.