बिहारमध्ये या वर्षअखेरीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील सत्ता टिकविण्याचे आव्हान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमोर असल्याने त्यांनी बिगर-एनडीए पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. जनता परिवाराच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू असतानाच नितीशकुमार यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नितीशकुमार यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी तिहार कारागृहात जाऊन आयएनएलडीचे प्रमुख ओमप्रकाश चौताला यांचीही भेट घेतली. इतकेच नव्हे, तर दुपारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत भोजन घेतले आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यांच्याशीही चर्चा केली.