पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीचा उल्लेख ‘भ्रष्टाचारवादी कॉंग्रेस पार्टी’ म्हणून करीत होते, आता राज्यातील भाजप सरकारने कोणाच्या जीवावर विश्वासदर्शक ठराव जिंकला, असा प्रश्न विचारत संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी गुरुवारी भाजपवर आणि मोदींवर हल्ला चढविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारने बुधवारी विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. मतविभाजन घेण्याची विरोधकांनी केलेली मागणी यावेळी मान्य करण्यात आली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी गुरुवारी मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, बिहारमध्ये मी लालूप्रसाद यादव यांच्या पक्षासोबत आघाडी केली, त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली होती. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या साथीने विश्वासदर्शक ठराव जिंकणारे आता काय बोलणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खुर्चीचे भुकेले कोण आहेत, हे सुद्धा यातून दिसले असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.