बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार गुरुवारी पाकिस्तानच्या आठवडाभराच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी हा दौरा आखला आहे.
नितीशकुमार आपल्या १२ सदस्यीय शिष्टमंडळासह सकाळी दिल्लीत दाखल झाले, त्यानंतरते विमानाने दुबईमार्गे पाकिस्तानला रवाना झाले. पंजाब आणि सिंध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते प्रामुख्याने भेटणार असून पाकिस्ताचे अध्यक्ष असीफ अली झरदारी आणि पंतप्रधान रझा परवेज अश्रफ यांना ते भेटणार की नाहीत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. बिहारमधून पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना पाठिंबा देणाऱ्या मुत्तहिदा कौमी मूव्हमेंटच्या नेत्यांना ते आवर्जून भेटणार आहेत. मोहम्मद अली जिना यांचे समाधीस्थळ, मोहोंजो दरो येथील पुरातन परिसर, तक्षशिला विद्यापीठ, डेरा साहेब गुरुद्वारा, महाराजा रणजित सिंह याची समाधी आदी स्थळांनाही ते भेट देणार आहेत. परतीच्या प्रवासात ते वाघा सीमारेषेवरुन रस्तामार्गे येणार आहे.