जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याआधी भारतीय जनता पक्षाने आपले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर केले असून त्यात कलम ३७० रद्द करण्याबाबत चकार शब्दही काढलेला नसून पंडितांना काश्मीर खोऱ्यात तीन राखीव जागा ठेवण्याचे आश्वासन मात्र आहे. याचा लाभ अमिराकादल आणि हब्बाकादल मतदारसंघांत होऊ शकतो.
काश्मीर खोऱ्यातील ४६ मतदारसंघांपैकी तीन जागा पंडितांना राखीव ठेवण्याचा मनोदय पक्षाने व्यक्त केला आहे. अमिराकादल आणि हब्बाकादल येथे अतिरेक्यांनी मतदानावर बहिष्कार पुकारला, तर पंडितांची मते निर्णायक ठरू शकतात. पंडित समाजाचे न्याय्य आणि सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्याची हमीही भाजपने दिली आहे. खोऱ्यात जोवर पंडितांचे पुनर्वसन पूर्ण होत नाही तोवर जम्मू वा देशाच्या अन्य भागांत त्यांना सुखाने राहाता यावे, याची आम्ही दक्षता घेऊ, असेही म्हटले आहे.
आमच्या पुनर्वसनाबाबत स्पष्ट योजना मांडली गेली नाही, तर ‘नोटा’चा पर्याय वापरला जाईल, असे काश्मिरी पंडितांच्या काही संघटनांनी गेल्या आठवडय़ात जाहीर केले होते.
विशेष म्हणजे काश्मीर विधानसभेतील २४ जागा या पाकव्याप्त काश्मिरातील म्हणून रिकाम्या असतात. त्यापैकी पाच जागा या पाकव्याप्त काश्मिरातील निर्वासितांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्याची घोषणाही भाजपने केली आहे.
कलम ३७०बाबत भाजप मौन का बाळगत आहे, असे विचारता आम्ही काश्मिरी जनतेला गरिबीच्या खाईतून बाहेर काढू इच्छितो, असे पक्षाचे सरचिटणीस राम माधव म्हणाले. पर्यटन, पायाभूत सुविधा, आधुनिकीकरण आणि विकास या चार मुद्दय़ांवर भाजपने या ‘डॉक्युमेंट’मध्ये भर दिला आहे.