सरकारकडून करण्यात येणारी आधार कार्डाची सक्ती कायमच विरोधकांच्या टीकेचा विषय राहिला आहे. झारखंडमधील एका घटनेमुळे हा विरोध आणखीनच धारदार होण्याची शक्यता आहे. येथील सिमडेगा जिल्ह्यातील एका शिधावाटप दुकानात रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. २८ सप्टेंबरला ही घटना घडली होती. दुर्देवाची गोष्ट म्हणजे यानंतर त्या कुटुंबातील संतोषी कुमारी या ११ वर्षीय मुलीचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. शेवटच्या क्षणापर्यंत ही मुलगी ‘भात खायला द्या’, अशी विनवणी करत होती. मात्र, घरात धान्यच नसल्यामुळे कुटुंबीयांना तिला काहीच खाऊ घालता आले नाही. परिणामी तिचा मृत्यू झाला. मी रेशनच्या दुकानावर तांदूळ आणायला गेले होते. मात्र, दुकानदाराने तुम्हाला रेशन मिळणार नाही, असे सांगितले. दिवसभर काहीच न खाल्ल्यामुळे माझ्या मुलीचे पोट खूप दुखत होते. २४ तास उलटून गेले तरी माझ्या मुलीच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. अखेर माझ्या मुलीने ‘भात-भात’ म्हणत जीव सोडला, अशी प्रतिक्रिया मृत मुलीची आई कोयली देवी यांनी दिली.

साहजिकच हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनावर टीका होण्यास सुरूवात झाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कुटुंबाचे रेशन कार्ड आधारला जोडण्यात आले नव्हते. त्यामुळे हे रेशन कार्ड रद्द करण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना झारखंडचे अन्नपुरवठा मंत्री सरयू राय यांनी म्हटले की, आधार कार्ड नसले तरी लोकांना रेशन द्या, असा स्पष्ट आदेश मी दिला होता. त्यामुळे संबंधितांची ओळख पटवून त्यांना धान्य दिले जाणे अपेक्षित होते. त्यामुळे खरंच आधार कार्डामुळे अडवणूक होऊन कुणाचा मृत्यू झाला असेल तर अधिकाऱ्यांनी याविरूद्ध कडक कारवाई केली पाहिजे, असे सिरया यांनी सांगितले. सरकारने काही महिन्यांपूर्वी शिधावाटप दुकानांमधून आधारकार्ड व ठशांच्या आधारे सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.