सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या युवतींबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या राष्ट्रपतीपुत्र अभिजीत मुखर्जी यांच्या माफीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाने ‘क्षमाशीलते’चे धोरण स्वीकारायचे ठरविले आहे. जर एखादी व्यक्ती स्वत:ची चूक सुधारू पाहत असेल तर त्या व्यक्तीच्या केवळ दोषांकडेच लक्ष देण्यापेक्षा आपण त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले.अभिजीत मुखर्जी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का, या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी यांनीही खुर्शीद यांचीच री ओढली. मुखर्जी यांनी स्वत:च माफी मागितली असल्याने त्यांना संधी द्यावयास हवी, असे अल्वी यांनी सांगितले.