दहशतवादविरोधी मोहिमांचे दूरचित्रवाहिन्यांवरून प्रक्षेपण करण्यास मनाई करायला हवी, असे मत केंद्रीय गृह मंत्रालयाने व्यक्त केले आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘दहशतवाद विरोधी मोहिमा’ आणि ‘दहशतवाद प्रतिबंधक कारवाया’ यांची व्याख्या विचारली होती. त्यावर गृहमंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यापूर्वी, गृह मंत्रालयाने या मंत्रालयाला दहशतवादविरोधी मोहिमांचे थेट प्रक्षेपण थांबवण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यास सांगितले होते.
दहशतवादविरोधी मोहिमांचे थेट प्रक्षेपण करणे ही सुरक्षेच्या वेगवेगळ्या पैलूंशी तडजोड असून, त्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि ओलीस ठेवण्याच्या परिस्थितीत निष्पाप लोक यांचा जीव धोक्यात येतो, असे गृह मंत्रालयाने कळवले आहे.
२६.११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस दूरचित्रवाहिन्यांनी एनएसजीच्या मोहिमेचे थेट प्रक्षेपण केल्याचा वाईट अनुभव सांगून गृह मंत्रालयाने म्हटले आहे, की अशा थेट प्रक्षेपणामुळे केवळ मोहिमेची गुप्तता व परिणामकारकता यांच्यावरच परिणाम होत नाही, तर सुरक्षा दले, सामान्य नागरिक आणि वार्ताहर यांची सुरक्षाही धोक्यात येते.
मुंबईवरील हल्ल्यानंतर नॅशनल ब्रॉडकास्टर असोसिएशनने दहशतवादी परिस्थितीच्या थेट वृत्तांकनावर र्निबधांसह नियमावली तयार केली होती, परंतु अद्याप दहशतवादविरोधी मोहिमांच्या थेट प्रक्षेपणावर अधिकृतरीत्या काहीही बंदी नाही.