परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या दोघींच्या राजीनाम्याच्या बदल्यात वस्तू व सेवा विधेयकाला (जीएसटी) राज्यसभेमध्ये मदत करण्याची काँग्रेसने ऑफर देण्यात आल्याचे वृत्त पक्षाने फेटाळून लावले आहे. पक्षाला नैतिकता आणि घटनात्मक जबाबदारीची जाणीवर असल्याने अशा प्रकारच्या कोणत्याही ऑफरचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. नैतिकतेची जबाबदारी स्विकारून सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आल्याचेही ते पुढे म्हणाले. गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या ललित मोदी यांना मदत करण्याची नव्हे तर, जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे ही मोदी सरकारची जबाबदारी असल्याचाही टोला यावेळी रणदीप यांनी लगावला.
सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंचे राजीनामे घ्या आणि जीएसटीला पाठिंबा मिळवा – कॉंग्रेसची खेळी
दरम्यान, आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्याच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱयात सापडलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या दोघींचे राजीनामे भाजपने घ्यावेत. त्याबदल्यात वस्तू व सेवा विधेयकाला (जीएसटी) कॉंग्रेस राज्यसभेमध्ये मदत करेल, अशी ऑफर पक्षाकडून देण्यात आली असल्याचे वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले होते.