भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी सहा बँकांच्या डेबिट कार्डवर बंदी घातल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. आयआरसीटीसीने कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डवर बंदी घातलेली नाही असे रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर म्हटले आहे.

‘आयआरसीटीसी’ने वेबसाईट किंवा अॅपवरुन रेल्वे तिकीट बुक करताना काही बँकांच्या डेबिट कार्डावर बंदी घातल्याचे वृत्त शुक्रवारी व्हायरल झाले होते. आयआरसीटीसी आणि संबंधित बँकांमध्ये तिकीट बुक करताना जे शुल्क आकारले जाते त्यावरुन मतभेद झाले आणि त्यामुळे आयआरसीटीसीने बंदी घातली असे सांगितले जात होते. या वृत्तामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शेवटी शुक्रवारी रात्री उशीरा रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे हे वृत्त निराधार आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. आयआरसीटीसीने कोणत्याही बँकेवर बंदी घातलेली नाही, सर्व बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे तिकीट बुक करता येईल असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.

आयआरसीटीसी आणि बँकेत नोंदणी शुल्कावरुन वाद होता. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डाद्वारे काढलेल्या तिकीटांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचे बँक आणि आयआरसीटीसीमध्ये समान वाटप व्हावे असे रेल्वेचे म्हणणे आहे. तर बँकांचा यास विरोध आहे. यासंदर्भात बँक आणि आयआरसीटीसीमध्ये बैठकही झाली. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नव्हता.