भारताने द्विपक्षीय संवादात सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याशिवाय नव्याने चर्चा सुरू  करता येणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. थोडक्यात काश्मीरशिवाय दोन्ही देशात चर्चा होणार नाही असे त्या देशाचे म्हणणे आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक व भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक  यांच्यात पुढील आठवडय़ात चर्चा होणार आहे. प्रत्यक्ष ताबा रेषा व सीमेवर तणाव असतानाही ही चर्चा होत आहे. विषयसूचीवर असलेल्या सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याशिवाय द्विपक्षीय संवाद
शक्य नाही, असे अझीज यांनी सांगितल्याचे रेडिओ पाकिस्तानने म्हटले आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अझीज यांनी सांगितले की, भारताने काही अटी घातल्यामुळे दोन्ही देशात संरक्षण सल्लागार पातळीवर होणार असलेली चर्चा ऐनवेळी रद्द करावी लागली. काश्मिरी फुटीरतावाद्यांना सरताज अझीज भेटणार असतील तर त्यांनी चर्चेसाठी येऊच नये अशी भारताची भूमिका होती, पण नंतर पाकिस्ताननेच ही चर्चा रद्द केली. पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेत काश्मीरचा विषय घुसवल्याने भारताची नाराजी कायम आहे. त्याचबरोबर सीमेवर सध्या चकमकी होत असून दोन्ही
देशांमध्ये प्राणहानी झाली आहे. जुलैमध्ये रशियात उफा येथील बैठकीत पंतप्रधान मोदी व त्यांचे समपदस्थ नवाझ शरीफ यांची भेट झाली होती
त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भारताची वागणूक प्रादेशिक महासत्तेसारखी- सरताज अझीझ