विशेष तपास पथकाचा न्यायालयात दावा
‘दंगल घडवा आणि लोकांना मारा, असे मोदी यांनी कधीच म्हटले नाही’ असे गुजरात दंगलींच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) वकिलांनी गुरुवारी न्यायालयात सांगितले. मोदींनी दंगल भडकावल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे सांगतानाच सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांनी मोदींवर आरोपांचे कुभांड रचल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुजरात दंगलीबाबत एसआयटीच्या तपासबंद अहवालाला आक्षेप घेणारी याचिका या दंगलीत ठार झालेले काँग्रेस  खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झकीया यांनी केली आहे. याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीत एसआयटीचे वकील आर. एस. जमुआर यांनी सेटलवाड यांच्यावर निशाणा साधला. ‘दंगलखोरांवर कारवाई न करण्याचे आदेश मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले, हा आरोप सेटलवाड यांच्या कल्पनेतून आला आहे. याबाबत कोणतेही पुरावे नाहीत,’  असे ते म्हणाले.
मोदी यांनीच दंगली घडविल्या, हा झकीया जाफरी यांचा आरोप खोडून काढत जमुआर म्हणाले,‘मोदी २००१मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर तीन महिन्यांत दंगली झाल्या. कोणता मुख्यमंत्री इतक्या कमी वेळात असे कटकारस्थान रचू शकेल?’