तलबिरा-२ कोळसा खाणीचे वाटप करताना हिंदाल्को कंपनीवर कोणत्याही प्रकारे मेहेरनजर करण्यात आली नाही, कोळसा खाणीचे वाटप करताना प्रचलित पद्धतीचा अवलंब करण्यात आला, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी डॉ. सिंग यांची १० दिवसांपूर्वी चौकशी केली तेव्हा त्यांनी वरील बाब स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयने या चौकशीचा प्रगती अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केला त्यामध्ये डॉ. सिंग यांच्या स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी ७ मे २००५ आणि १७ जून २००५ रोजी पत्र लिहून तलबिरा-२ कोळसा खाण हिंदाल्कोला देण्याची विनंती केली. त्यानंतर पंतप्रधानांचे कार्यालय आणि कोळसा मंत्रालयात कोणत्या घडामोडी घडल्या, असे डॉ. सिंग यांना चौकशीच्या वेळी विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.