गुजरातचे घमासान
सलग तिसऱ्यांदा गुजरातची सत्तासूत्रे हाती घेऊ पाहाणारे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दंगलखोरीचा मुद्दा उपस्थित करण्याची विरोधकांची धडपड शिगेला पोहोचली असतानाही आणि मोदी यांच्याविरोधात दंड थोपटणारे पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नीला काँग्रेसने तिकिट दिले असतानाही मणिनगर मतदारसंघातील मोदी यांचा विजय गृहीत धरला जात आहे.
संजीव भट्ट यांनी मोदी सरकारला न्यायालयात ओढले आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीला मोदी यांचाच आशीर्वाद होता, असा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या पत्नी कथ्थक नृत्यांगना श्वेता भट्ट यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तरी मोदींच्या तुलनेत त्या कमकुवत उमेदवार आहेत, असे अल्पसंख्यक समाजालाही वाटते. काँग्रेसचा उमेदवार म्हणून आणि संजीव भट्ट यांची पत्नी म्हणून त्या काही मते खेचतील पण मोदींना पराभूत करण्याइतकी ती नसतील, असे मतदारांना वाटते. त्यातच या मतदारसंघात या दोघांसह आणखी दहा उमेदवार आहेत. त्यामुळेही मोदीविरोधी मतांची फाटाफूटच अधिक होणार आहे.
मोदी यांचे कट्टर विरोधक आणि पटेल समाजाची मते मोठय़ा प्रमाणात खेचू शकणारे केशुभाई पटेल यांनी माघार घेतली आहे, ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. केशुभाईंनी गुजरात परिवर्तन पक्ष या पक्षाची स्थापना केली असून सुरेश मेहता आणि काशीराम राणा यांचीही साथ त्यांना लाभली होती. राणा यांचे निधन झाल्याने या पक्षाला हादरा बसला आहे.
या पाश्र्वभूमीवर मोदी यांचा पराभव होईल, असे अल्पसंख्यक समाजालाही वाटत नसल्याचे जाणवते. कपडे शिवून घर चालविणाऱ्या महम्मद मोहसिन अन्सारी यांनी सांगितले की, सद्भावना यात्रेच्या माध्यमातून मोदींनी कडव्या हिंदुत्वाची
भूमिका सौम्य केल्यामुळे अल्पसंख्याक समाजातूनही त्यांना मते मिळू शकतात. पण गुजरात दंगल ही सरकारच्या पाठबळाशिवाय भडकूच शकत नव्हती, हे मतदार विसरू शकत नाहीत. दूधविक्रेता सलीमभाई याला मात्र सद्भावना यात्रेचा कोणताही प्रभाव जाणवत नाही. काँग्रेसला केवळ उमेदवार कमकुवत असल्यामुळेच कमी मते पडू शकतात, अशी भीती त्याला वाटते. ए. एम. मलिक यांना वाटते की गुजरातच्या विकासाची जाहिरात खूप होत असली तरी मुस्लीम वस्त्यांमध्ये विकासाचा लाभ पोहोचलेला नाही.
विशेष म्हणजे आपल्याच मतदारसंघात मोदी उमेदवारी अर्ज भरल्यापासून एकदाही फिरकलेले नाहीत! आपल्याला विजयाची खात्री असून श्वेता भट्ट यांची उमेदवारी आपल्या खिजगणतीतही नाही, असेच मोदी यातून भासवत आहेत, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. त्यात भर म्हणून काँग्रेस भट्ट यांना ब्राह्मण समाज भरभरून मते देईल, असे मानत आहे! या मतदारसंघात ब्राह्मणांचे बाहुल्य असून भट्ट या ब्राह्मणच असल्याने ब्राह्मणांची मते त्यांना मिळतील, तसेच ख्रिश्चन व अनुसूचित जाती-जमातीची मतेही त्यांना मिळतील, असे काँग्रेस नेते बलदेव देसाई यांचे गणित आहे.
पहिल्या टप्प्यातले मतदान आज
गुरुवारी जवळपास निम्म्या गुजरातमधील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सौराष्ट्रातील सात जिल्ह्य़ांतील ४८ मतदारसंघांत, दक्षिण गुजरातच्या पाच जिल्ह्य़ांतील ३५  मतदारसंघांत आणि अहमदाबाद जिल्ह्य़ातील चार मतदारसंघांत गुरुवारी ८७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत नोंदले जाणार आहे. या ८७ जागांसाठी तब्बल ८४६ उमेदवार रिंगणात आहेत.
गुरुवारच्या मतदानात नरेंद्र मोदी, केशुभाई पटेल, विधानसभा अध्यक्ष गणपत वसावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया आणि विरोधी पक्षनेते शक्तिसिंह गोहिल यांचे भवितव्य ठरणार आहे. वाजुभाई वाला, वसुबेन त्रिवेदी, नरोत्तम पटेल, मांगूभाई पटेल, पुरुषोत्तम सोलंकी, क्रितीसिंह राणा, दिलिप संघानी, कानुभाई भलाला, मोहन कुंदरिया आणि रणजीत गिलिटवाला हे मंत्रीही मतदारांना सामोरे जाणार आहेत.
मोदींमागे पठाण
मोदींची मुस्लीमविरोधी प्रतिमा सौम्य करण्यासाठी भाजपही सरसावली असून खेडा येथील मोदी यांच्या प्रचारसभेत क्रिकेटपटु इरफान पठाण याच्या सहभागाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पठाण मुळचा बडोद्याचा असून तंदुरुस्त नसल्याच्या कारणावरून सध्या तो मैदानाबाहेर आहे. मोदींसह तो व्यासपीठावर पूर्ण वेळ होता. या सभेत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. उत्तर प्रदेश निवडणुकीत गरीबांना धीर देणारे राहुल गांधी यांची जितकी छायाचित्रे काढली गेली तितकीसुद्धा मते काँग्रेसला मिळाली नाहीत, असा टोला त्यांनी हाणला. सद्भावना यात्रेद्वारे मोदी यांनी प्रथम अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थात या पक्षाने निवडणुकीत एकाही अल्पसंख्याक नेत्याला उमेदवारी दिलेली नाही.