तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षे तुरूंगवास व १०० कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यांना लगेच जामीन मिळू शकला नसला तरी त्यांच्या या अर्जावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. अगोदर न्यायालयाने या अर्जावरची सुनावणी ६ ऑक्टोबपर्यंत लांबणीवर टाकण्याचे जाहीर केले होते. सुटीतील न्यायालयापुढे जामीन अर्ज सादर केल्यानंतर त्यावरील सुनावणी ६ ऑक्टोबपर्यंत लांबणीवर टाकली, पण जयललिता यांचे वकील राम जेठमलानी यांनी लगेच न्यायालयाच्या निबंधकांकडे धाव घेऊन तातडीच्या सुनावणीची मागणी केली.
न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एच वाघेला यांनी जयललिता यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी करण्याचे मान्य केले, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
हे प्रकरण सुटीतील न्यायालयापुढे सुनावणीसाठी आले असताना जेठमलानी यांनी असा युक्तिवाद केला की, गुन्हेगारी दंडसंहिता कलम ३८९ अन्वये जर एखाद्या प्रकरणी अपील प्रलंबित असेल तर जामीन देता येतो. कलम ३८९ अन्वये दोषी व्यक्तीविरोधात अपील प्रलंबित असेल तर न्यायालय शिक्षेला स्थगिती देऊ शकते. जर एखादी व्यक्ती तुरूंगात असेल तर तिला व्यक्तिगत जातमुचलक्यावर सोडता येते.