नोटाबंदीच्या निर्णयामुळे नेमका किती काळा पैसा बाहेर आला याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असा दावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केला आहे. एवढेच नाही तर ५०० आणि १ हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर आणि नव्या नोटा चलनात आल्यानंतर नेमका किती बेहिशोबी पैसा कायदेशीरित्या चलनात आला हे सांगणेही कठीण असल्याचे आरबीआयने संसदीय समितीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. तसेच २ हजार आणि ५०० च्या नव्या नोटा चलनात आल्या. मात्र आता या सगळ्या निर्णयाबाबत आरबीआयने दिलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. गेल्या आठवड्यात नोटाबंदीनंतर परत आलेल्या नोटांचा आकडा आरबीआयने जाहीर केला होता.

नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या एकूण नोटांपैकी १५.२८ लाख कोटी रूपयांच्या नोटा परत आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. चलनातून बाद झालेल्या एकूण नोटांपैकी ९९ टक्के चलन परत आल्याचे यावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे नोटाबंदी ही फक्त १ टक्क्यासाठी झाली का? असाही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.

नोटाबंदीचे धोके आधीच सांगितले होते, या निर्णयामुळे विकासदराला फटका बसला असे परखड मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडले होते. मी सरकारला नोटाबंदीची योग्य तयारी न करता निर्णय घेतल्यास नुकसान होईल असा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही नोटाबंदीचा हा निर्णय घेतला गेला असेही राजन यांनी म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांच्या आतच नोटाबंदीमुळे किती काळा पैसा बाहेर आला हे ठाऊक नाही हे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.