उधमपूर येथे एका बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संस्थांकडून आपल्याला ‘निश्चित’ अशी माहिती मिळाली नव्हती, असे सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी स्पष्ट केले. बीएसएफच्या वाहनांच्या एका ताफ्यातून वेगळ्या झालेल्या बसमध्ये ४४ नि:शस्त्र जवान होते आणि त्यातील एकमेव सशस्त्र जवानाने बसमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांशी लढा दिला होता.
जम्मू-श्रीनगर महामार्गावर गेल्या दोन दशकांमध्ये अशाप्रकारचा हल्ला झाला नसल्यामुळे तो तुलनेने सुरक्षित मानला जात होता, असे हल्ल्यानंतर बुधवारी घटनास्थळाला भेट दिलेले बीएसएफचे प्रमुख देवेंद्र पाठक यांनी सांगितले. बसमध्ये शस्त्रासह असलेला एकमेव जवान कॉन्स्टेबल रॉकी याने शूरपणाने व परिणामकारकरीत्या लढा देऊन आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले, असेही ते म्हणाले.
या हल्ल्याबाबत कुठलीही निश्चित पूर्वसूचना मिळाली नव्हती. सुमारे २० वर्षे या भागात अशी काही घटना झालेली नव्हती, मात्र याचा अर्थ भविष्यात काही होणार नाही असा नव्हे. परंतु तुलनेने हा भाग सुरक्षित मानला जात होता व आम्ही हल्ल्याला प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे, असे बीएसएफचे महासंचालक पाठक यांनी पत्रकारांना सांगितले. सुमारे एक डझन वाहनांचा ताफा त्यांच्या जम्मूतील तात्पुरत्या शिबिरातून श्रीनगरकडे जात असताना बीएसएफची गडद हिरव्या रंगाची बस या ताफ्यातून ‘वेगळी’ झाली आणि तिच्यावर हल्ला झाला. हातात शस्त्र घेतलेला एक दहशतवादी रस्त्याच्या मधोमध उभा झाला आणि त्याने बसला थांबण्याचा इशारा करून बसवर गोळीबार सुरू केला.
पाकिस्तानी माध्यमांनी नावेदचा उल्लेख टाळला
कराची: जम्मू-काश्मीरमधील उधमपूरजवळ भारतीय जवानांवर हल्ला करणारा पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याला जेरबंद केल्यानंतर पाकिस्तानमधील दोन इंग्रजी वर्तमानपत्रेवगळता इतर प्रसारमाध्यमांनी नावेदचा उल्लेखही टाळला आहे. बुधवारी नावेद पाकिस्तानी सीमारेषेवरून भारतात आल्यानंतरही पाकिस्तानसाठी ही छोटीशी बातमी ठरली.  पाकिस्तानमधील ‘डॉन’ या सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या इंग्रजी वर्तमानपत्राने ‘दोन बीएसएफ जवान, हल्लेखोराचा मृत्यू-भारतीय पोलीस’ अशा मथळ्याखाली या घटनेला प्रसिद्धी दिली. ‘द न्यूज’, ‘इंटरनॅशनल’ या वर्तमानपत्रांनी या बातमीला स्थान दिलेले नाही. तर या वृत्तपत्रांनी शस्त्रसंधी उल्लंघन या लेखात भारतावरच आरोप केले.