वाराणसीसारखा हक्काचा मतदारसंघ सोडावा लागल्याने नरेंद्र मोदींवर खार खाऊन असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ‘देशात मोदींची नव्हे तर भाजपची लाट आहे’, असे विधान करत जोशी यांनी रविवारी स्वपक्षीयांचा रोष ओढवून घेतला. जोशी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पक्षप्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी नकार दिला आहे.
भाजपच्या जाहीरनामा तयार करण्याऱ्या समितीचे अध्यक्ष असलेले जोशी यांनी केरळमधील ‘मनोरमा वृत्त’ या वाहिनीशी बोलताना उपरोल्लेखित विधान केले. तसेच गुजरातच्या विकासाचे प्रारूप देशभरात सगळीकडेच लागू होईल असे नाही, असा टोलाही जोशी यांनी या वेळी हाणला. रालोआचे विकासाचे स्वतंत्र प्रारूप असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते  जसवंतसिंह यांना तिकीट नाकारण्याबरोबरच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने नव्हे तर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी घेतल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.