‘सरोगसी’साठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांना १ नोव्हेंबरपासून पर्यटक व्हिसा दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे. पर्यटक व्हिसा काढून भारतात यायचे आणि सरोगसीची प्रक्रिया उरकून घ्यायची, असे अनेक प्रकार आजवर घडले आहेत. मात्र आता पर्यटक व्हिसावर ही सूट दिली जाणार नाही. या परदेशी नागरिकांना वैद्यकीय व्हिसासाठीच अर्ज करावा लागेल. पर्यटक व्हिसा काढून जर असे प्रकार घडले तर व्हिसाधारकावर कारवाई केली जाईल, असे गृह मंत्रालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सरोगसीबाबतचे नियमही काटेकोर असल्याने त्याचे पालनही झाले पाहिजे. भारतात येऊन सरोगसी करून घेणाऱ्या परदेशी जोडप्याचा विवाह झाला असला पाहिजे आणि विवाहाला दोन वर्षे झाली असली पाहिजेत. व्हिसा अर्जासोबत हा नागरिक ज्या देशाचा आहे त्या देशाच्या भारतातील दूतावासाकडून भारतीय परराष्ट्र खात्याला व्हिसाची विनंती करणारे पत्र हवे.त्यात, त्या देशात सरोगसी कायदेशीर असून या प्रक्रियेतून भारतीय स्त्री ज्या अपत्याला जन्म देईल, त्याला पित्याच्या देशाचे नागरिकत्वही मिळेल, अशी हमी असली पाहिजे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने प्रमाणित केलेल्या रुग्णालयातच ही सरोगसी प्रक्रिया पार पडली पाहिजे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.