दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे लोकांना कळून चुकले होते, त्यामुळेच लोकांनी पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. त्यामुळे आणीबाणी लागू करण्याबाबत माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी आणीबाणीचे समर्थन केले.
ते म्हणाले, आम्ही माफी का मागायची? काही गोष्टी घडल्या असतील पण त्यानंतर इंदिरा गांधी यांना लोकांनी सत्ता दिली, त्यामुळे आम्ही माफी मागावी असे वाटत असले तर भारताच्या जनतेलाही माफी मागण्यास सांगावे लागेल. कारण त्यांनी आणीबाणीनंतर काही वर्षांतच इंदिरा गांधी यांना निवडून दिले होते. त्या वेळचे जे सरकार होते त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले, त्यामुळे पुन्हा इतिहासात जाण्याचे कारण नाही व माफी मागण्याचाही प्रश्न नाही. आणीबाणी लावल्यानंतर लोकांना पहिल्यांदा ती चुकीची वाटली तेव्हा त्यांनी आम्हाला सत्तेवरून घालवले, पण त्यांना जेव्हा आणीबाणी बरोबर होती असे वाटले तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाला परत सत्ता दिली. आता कुणी माफी मागण्याची गरज नाही आणि माफी मागून काही फरकही पडणार नाही.
आणीबाणीबाबत काँग्रेसने माफी मागावी असे तुम्हाला वाटत नाही काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्या वेळी जे घडले त्याला अनेक प्रश्न कारणीभूत होते, आणीबाणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केल्याबद्दल विरोधकांनीही माफी मागावी अशी मागणी आपणही करतो. परत इतिहास उगाळत बसण्यापेक्षा देशापुढे आज असलेल्या प्रश्नांकडे पाहा, असा सल्ला खुर्शिद यांनी दिला.