काही दिवसांपूर्वी चेन्नईतील रेल्वेस्थानकावर भरदिवसा इन्फोसिसमधील कर्मचारी महिलेची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी कुणीही माझ्या मुलीला वाचविण्यासाठी पुढे आले नाही. या बघ्यांच्या गर्दीमुळे आमच्यापासून आमची मुलगी हिरावली गेली, अशी खंत मुलीच्या पित्याने एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर याठिकाणच्या लोकांनी ट्रेन पकडून त्याठिकाणहून काढता पाय घेणे पसंत केले.
एस.स्वाथी नावाची महिला शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चेन्नईतील नुनगंबकम रेल्वे स्थानकावर उभी असताना एका अज्ञाताने तिच्या चेहरा आणि मानेवर धारधार शस्त्राने वार केले आणि तेथून पसार झाला होता. स्वाथी आपल्या नियोजित वेळेनुसार कामावर जात असताना हा प्रकार घडला होता. घटना घडली त्यावेळी रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवासी उपस्थित होते. तरीसुद्धा या महिलेला वाचविण्यासाठी कोणीच पुढे सरसावले नव्हते. यावेळी कुणीतरी हल्लेखोराला प्रतिकार केला असता तर तिचा जीव वाचला असता. उदासीनतेमुळे किंवा स्वार्थीपणामुळे त्यांनी तसे केले नाही. मात्र, आपण असे वागता कामा नये, असे मुलीचे वडील गोपाल कृष्णन यांनी म्हटले. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने याप्रकरणातील कुर्मगती पोलीस तपासावर आणि कारभारावर ताशेरे ओढले आहेत. या घटनेनंतर स्वाथीचा मृतदेह दोन तास तसाच पडून होता. यावेळी पोलीस कुठे होते, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मारेकऱ्याला शोधण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.