चीनच्या विदेश मंत्रालयाने उत्तर कोरिया आणि अमेरिकेने एकमेकांवर आरोप करू नयेत असा सल्ला दिला आहे. कोरियन द्वीपसमूहात जर युद्धाचा भडका उडाला तर कोणीही जिंकू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

उत्तर कोरियाचे विदेश मंत्री री योंग यांच्या वादग्रस्त विधानानंतर चीनने आपले मत व्यक्त केले आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाविरोधा युद्ध छेडल्याचा आरोप योंग यांनी सोमवारी केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच युद्धाची घोषणा केल्याचे योंग यांनी म्हटले होते. अमेरिकेच्या प्रत्येक कारवाईला उत्तर देण्याची उत्तर कोरियाची क्षमता असल्याचा दम ही त्यांनी दिला होता.

ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन जास्त दिवस वाचू शकणार नाही, असे ट्विट केले होते. ट्रम्प यांची ही धमकी म्हणजे उत्तर कोरियाविरोधात युद्ध छेडल्याची घोषणा असल्याचे योंग यांनी म्हटले होते. उत्तर कोरिया सरकारला संपवायचे नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने सोमवारीच स्पष्ट केल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता लू यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब आणि क्षेपणास्त्र चाचणी केल्यापासून अमेरिका आणि उत्तर कोरियात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत उत्तर कोरियाला इशारा दिला होता.