अफगाणिस्तानच्या सीमेवरच्याच नव्हे तर देशातील दहशतवाद्यांच्या गटांवर सर्वंकष कारवाई करावी असे अमेरिकेने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांना सांगितले.
शरीफ यांनी ओबामा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. उत्तर वझिरीस्तानात लष्कराने केलेल्या कारवाईबाबत अमेरिकी अधिकाऱ्यांनी शरीफ यांचे कौतुक केले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख झाल्यानंतर त्यांची ही पहिली अमेरिका भेट होती. पाकिस्तानी लष्कराने काही निवडक लष्करी गटांवर कारवाई केली असून त्याला अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. लष्कर-ए-तय्यबा व हक्कानी नेटवर्क यांच्यावरही कारवई करावी, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
    पाकिस्तानी शिष्टमंडळाने अमेरिका- पाकिस्तान यांच्यातील नागरी व लष्करी सहकार्यावर भर दिला असून मदत कायम ठेवण्याची अपेक्षा केली आहे. पाकिस्तानने लष्करी गटांवर कारवाई चालूच ठेवावी. ओबामा प्रशासन व अमेरिकी काँग्रेस यांना त्याचीच काळजी आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस, जनरल मार्टिन डेमसे, रॉबर्ट वर्क यांची शरीफ यांनी भेट घेतली.
संरक्षण खात्याचे प्रवक्ते मेजर ब्रॅडली अव्हॉटस यांनी सांगितले की, पाकिस्तानची दहशतवादी कारवायाविरोधातील प्रगती व अमेरिकेचे सुरक्षा सहकार्य यावर चर्चा झाली.      दहशतवाद विरोधी कारवाई करताना भेदभाव केला जाणार नाही, दहशतवाद व धार्मिक दहशतवाद हे सारखेच धोके आहेत असे राहील शरीफ यांनी अमेरिकेला सांगितले.
पाकिस्तान स्टील्थ लढाऊ विमाने घेणार
पाकिस्तान चीनकडून स्टील्थ लढाऊ विमाने घेणार असून त्यामुळे पाकिस्तानची संरक्षण क्षमता वाढणार आहे. चिनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे संरक्षण उत्पादन मंत्री राणा तन्वीर हुसेन यांनी सांगितले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चीनकडून शस्त्रखरेदी करीत असल्याची कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनकडून पाकिस्तान ३० ते ४० शेनयांग एफसी ३१ विमाने घेणार असल्याचे जेनस डिफेन्स विकलीने म्हटले आहे.