अफझल गुरूला फाशी देण्यात आली.. ती योग्य की अयोग्य या वादात मला पडायचे नाही. पण राजकारण्यांनी त्याच्या फाशीचे राजकारण करू नये, अशी मागणी अफझल गुरू याच्या भावाने केली आहे.
अफझलचा चुलत भाऊ मोहम्मद यासिन याने सोपोर येथून दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. अफझलचे कुटुंब म्हणून आमची फक्त एकच मागणी आहे. त्याचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात यावा, त्याचे विधिवत अंत्यसंस्कार करण्याची आमची इच्छा आहे, असे यासिन याने सांगितले. त्यासाठी तिहार तुरुंगाचे अधीक्षक आणि बारामुल्ला जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याचेही यासिनने सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अफझलच्या कुटुंबीयांना त्याच्या दफन केलेल्या ठिकाणी प्रार्थना करण्याची परवानगी देण्याचा शासन विचार करेल, असे सांगितले होते. याबाबत बोलताना यासिन म्हणाला की त्याचा काहीही उपयोग नाही, आम्हाला त्याचा मृतदेह सोपोरमध्ये दफन करावयाचा आहे आणि शासनाने त्याला परवानगी द्यावी हीच आमची मागणी आहे.
अफझलच्या फाशीबद्दल देण्यात आलेले पत्र ही आमची क्रूर थट्टा असल्याचा आरोप त्याने केला. हे पत्र म्हणजे आमच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचे यासिनने सांगितले. शासनाकडून आम्हाला कोणतीही भीक नको, दिल्लीला आम्ही स्वखर्चाने जाऊ, असेही त्याने एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. भारतीय राजकारणी अफझलच्या फाशीचे राजकारण करीत आहेत आणि हे त्यांनी थांबवावे, असेही यासिनने शेवटी नमूद केले.