केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सरसंघचालकांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केल्याची चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र रा. स्व. संघ मोदी सरकारवर कोणताही दबाव आणत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रा. स्व. संघ मोदी सरकारवर कोणताही दबाव आणत नाही अथवा सरकारला कोणतेही मार्गदर्शन करीत नाही. मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांना आपली मते मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. राजनाथसिंह आणि पर्रिकर यांनी अलीकडेच सरसंघचालकांची भेट घेऊन चर्चा केली त्या प्रकरणाला विशेष महत्त्व देण्याचे गडकरी यांनी टाळले. देशाची सुरक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रांशी संबंधित गोष्टींबाबतच संघाला स्वारस्य आहे, असेही गडकरी म्हणाले. सरसंघचालकांशी झालेल्या भेटीच्या वेळी विशेष राजकीय चर्चा झाली नाही. दोन्ही मंत्र्यांनी एकापाठोपाठ सरसंघचालकांची भेट घेतली कारण त्यावेळी सरसंघचालक आठ दिवसांसाठीच नागपूर येथे होते आणि ज्यांना भेटण्याची इच्छा होती त्यांनाच सरसंघचालकांनी भेट दिली, असेही गडकरी म्हणाले. संघाचे पदाधिकारी म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य वाटेल ते भाष्य करतील, मात्र तुम्हाला योग्य वाटेल ते करा असे तुम्हाला सांगतील, असेही गडकरी म्हणाले.
सरसंघचालकाची भेट
राजनाथसिंह, पर्रिकर आणि आपण स्वत: संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहोत. राजनाथसिंह आणि पर्रिकर यांनी सरसंघचालकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी जे चित्र रंगविले त्यामध्ये एक टक्काही तथ्य नाही, असेही गडकरी म्हणाले.