भारताला सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्राचा (‘मोस्ट फेवर्ड नेशन’) दर्जा देण्याचा प्रस्ताव तूर्त समोर नसल्याचे पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, भारतासह अन्य शेजारी देशांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाकिस्तान वचनबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिल्यास त्याचा पाकिस्तानला लाभ होईल, असे मत जागतिक बँकेने व्यक्त केल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सध्या पाकिस्तानपुढे नाही. पाकिस्तानला प्रथम स्वत:च्या हिताचे रक्षण करण्यात स्वारस्य आहे, असेही दार यांनी एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. भारतासमवेत व्यापाराची नियमित प्रक्रिया पूर्ण केल्यास आणि भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिल्यास त्याचा पाकिस्तानलाच लाभ होईल, असे अलीकडेच जागतिक बँकेने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते.
दरम्यान, भारतासह अन्य शेजारी देशांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाकिस्तान वचनबद्ध असून त्यामध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार या क्षेत्रांचा समावेश आहे, असे दार म्हणाले.