इटलीतील न्यायालयाने बलात्कार प्रकरणात एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. बलात्कार होताना महिलेने आरडाओरडा न केल्याचे अजब तर्कट देत इटलीतील न्यायालयाने एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. आता या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश इटलीच्या न्यायमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

इटालियन वृत्तसंस्था एएनएसएने न्यायमंत्री एँड्रिया ओरलँडो यांनी बलात्कार प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त दिले आहे. ‘कथित बलात्कारावेळी महिलेने फक्त इनफ (enough) हा शब्द उच्चारला. महिलेची ही प्रतिक्रिया बलात्कार सिद्ध करण्यास अपुरी आहे. सहकाऱ्याकडून जबरदस्ती केली जात असताना महिलेने मदतीसाठी कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा केला नाही,’ असे इटलीतील तुरीन न्यायालयाने म्हटल्याचे वृत्त एएनएसए या वृत्तसंस्थेने दिले आहे.

इटालियन संसदेतील विरोधी पक्षाच्या नेत्या अॅनाग्राझिया कॅलाब्रिया यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘पीडित महिलेच्या प्रतिक्रियेवरुन तुम्ही त्या महिलेला काय सहन करावे लागले आहे, किती यातना भोगाव्या लागल्या आहेत, याची कल्पना करु शकत नाही,’ असे अॅनाग्राझिया कॅलाब्रिया यांनी म्हटले आहे.

महिलेने जबरदस्ती होत असताना पुरेसा प्रतिकार केला नाही, यावरुन आरोपीला निर्दोष ठरवणाऱ्या तुरीन न्यायालयाच्या निकालाविरोधात इटलीच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या निकालाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.