सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका
‘भारत माता की जय’चा जयघोष करण्यासाठी कोणावरही सक्ती करू नये, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली आहे. आपण असा भारत घडवू की, लोकांनी स्वत:च उत्स्फूर्तपणे भारत माता की जय म्हटले पाहिजे, असे भागवत म्हणाले. भारतीय किसान संघाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
संपूर्ण जगाने भारत माता की जय म्हणण्यासाठी आपण त्यांच्यापुढे मूल्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला श्रेष्ठ भारत निर्माण करावा लागेल. त्यानंतर नागरिक उत्स्फूर्तपणे भारत माता की जय म्हणतील. त्यासाठी कोणावर जबरदस्ती करण्याची गरज नाही, असे भागवत म्हणाले.
नव्या पिढीला भारत माता की जय म्हणायला शिकवण्याची वेळ आली आहे, असे विधान भागवत यांनी केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या विधिमंडळासह देशभरात वादंग माजले होते. या पाश्र्चभूमीवर संपूर्ण जगाने भारत माता की जय म्हणावे, अशी आमची इच्छा असल्याचे भागवत यांनी गेल्या रविवारी कोलकातामध्ये म्हटले होते.