गुजरातेतील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात इतर धर्मीयांना पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमनाथ मंदिर हे शंकराचे असून, तेथे सुरक्षा व पावित्र्याच्या कारणास्तव इतर धर्मीयांना परवानगीशिवाय प्रवेश द्यायचा नाही, असे ठरवण्यात आले आहे. सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, आता इतर धर्मीयांना या मंदिरात येण्यासाठी व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल, असे मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सूचनेत म्हटले आहे. गेल्या सोमवारी ही सूचना लावण्यात आली आहे. रोज हजारो लोक सोमनाथ मंदिरास भेट देत असतात. हे मंदिर गीर-सोमनाथ जिल्ह्य़ात असून माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल हे या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते अडवाणी हे विश्वस्त आहेत.
मंदिराचे उपव्यवस्थापक विजयसिंह चावडा यांनी सांगितले की, विश्वस्त मंडळाचे सचिव पी. के. लाहिरी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला. सुरक्षेचे काही प्रश्न होते व लोकांनाही प्रवेश नियंत्रित करण्याची मागणी केली होती, असे लाहिरी यांनी सांगितले.