नवरात्रोत्सवातील गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. त्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समितीने केली आहे. गरबामध्ये अनेकदा गैरहिंदू लोक येतात. ते हिंदू मुलींना फूस लावण्याचे काम करतात, असे समितीचे म्हणणे आहे. मुस्लिमांना गरबा प्रवेश मिळू नये, यासाठी समितीने ही मागणी केल्याचे समितीचे अध्यक्ष कैलाश बेगवानी यांनी स्पष्ट केले. भोपाळमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत समितीने ही मागणी केली.

निवडणूक ओळख पत्र किंवा अन्य कागदपत्रांप्रमाणे बनावट आधार कार्ड तयार करणे सोपे नाही. गरबामध्ये प्रवेशावेळी आधार कार्ड दाखवले तर त्याच्या ओळखीबाबत कोणतीही शंका उपस्थित होणार नाही, असे बेगवानी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. उत्सवानंतर हिंदू मुलींचे इतर धर्मातील लोकांकडून शोषण झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. गैरहिंदू लोक उत्सवादरम्यान हिंदू मुलींशी मैत्री करतात. त्यांना फूस लावतात, असेही त्यांनी सांगितले.

भोपाळमध्ये जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत हिंदू उत्सव समितीने ही मागणी केली आहे. या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. समितीचे जवळपास सहा हजार सदस्य आहेत. या बैठकीत समितीतर्फे आणखी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वात मांस विक्री आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, या मागण्यांचे निवेदनही समितीने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. बेकायदा मांस वाहतूक करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गणेश मूर्तीची उंची नऊ फुटांपेक्षा जास्त नको, अशी मागणीही केली होती. पण नियोजन समितीने ती फेटाळली.