पेट्रोल-डिझेलपाठोपाठ विनाअनुदानित गॅस सिलिंडर, केरोसिन आणि हवाई इंधन दरात रविवारी वाढ करण्यात आली. यामुळे विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना १८ रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
वर्षभरात मिळणाऱ्या अनुदानित १२ सिलिंडरची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडरसाठी सध्या दिल्लीत ५०९.५० रुपये मोजावे लागतात. आता दरवाढीमुळे त्यासाठी दिल्लीत ५२७.५० रुपये मोजावे लागणार आहेत. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात गेल्या सलग तीन महिन्यांत कपात करण्यात आली होती. तीन महिन्यांनंतर आता त्यात वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्यतिरिक्त वितरित करण्यात येणाऱ्या विनाअनुदानित केरोसिनच्या दरात सुमारे ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.