विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सोमवारी मोठी कपात करण्यात आली. हे दर प्रति सिलिंडर ११३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला. या निर्णयामुळे घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर विमानांमध्ये वापरण्यात येणाऱया हवाई इंधनाच्या दरात ४.१ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर कपातीनंतर ७५२ रुपये इतका असेल. याआधी या सिलिंडरची किंमत ८६५ रुपये इतकी होती, असे तेल कंपन्यांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात कपात करण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. गेल्या पाच महिन्यांत विनाअनुदानित सिलिंडरचे दर तब्बल १७०.५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. यूपीए सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार घरगुती ग्राहकांना प्रतिवर्ष १२ अनुदानित सिलिंडर देण्यात येतात. त्यानंतरचा सिलिंडर बाजारभावाप्रमाणे विकत घ्यावा लागतो.