योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड प्रॉडक्टस कंपनीने काढलेल्या पतंजली आटा नूडल्सला अद्याप केंद्रीय अन्नसुरक्षा आणि नियामक प्राधिकरणाने परवानगीच दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बाजारात आल्या आल्या रामदेव बाबा यांच्या कंपनीचे आटा नूडल्स वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
पतंजली आटा नूडल्सच्या पॅकेट्सवर ‘एफएसएसएआय’चा परवाना क्रमांक छापण्यात आला असला, तरी आमच्याकडून याबद्दल कोणतीही परवानगी घेण्यातच आलेली नाही, असे केंद्रीय अन्न सुरक्षा आणि नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष बहुगुणा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. एखाद्या नवीन उत्पादनाला आम्ही मंजुरीच दिलेली नसताना, त्याला परवाना क्रमांक कसा काय दिला जाईल, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पतंजली आटा नूडल्सच्या पॅकेट्सवर १००१४०१२०००२६६ असा ‘एफएसएसएआय’चा परवाना क्रमांक छापण्यात आला आहे. खाद्य पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारा परवाना राज्य सरकारकडून दिला जातो. मात्र, विक्रीसाठी आवश्यक असलेली मंजुरी केंद्रीय अन्न सुरक्षा आणि नियामक प्राधिकरणाकडूनच दिली जाते. ही परवानगी अद्याप आम्ही दिलेली नाही. परवाना क्रमांक कसा काय मिळाला मला माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.