चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अलीकडेच अहमदाबादला भेट दिली असता येथील हॉटेलांमध्ये नोकरीला असलेल्या ईशान्येकडील कर्मचाऱ्यांना जिनपिंग यांच्या भेटीवेळी कामावर न येण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच एका मॉलमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही अशीच वर्तणूक करण्यात आली. याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून केंद्रीय गृह मंत्रालयाने याची गंभीर दखल घेत प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून आज, मंगळवापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गुप्तचर विभागाला (आयबी) दिले आहेत.
जिनपिंग यांच्या भारतभेटीची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वगृह राज्य असलेल्या गुजरातपासून झाली. यावेळी अहमदाबाद येथे त्यांच्या स्वागतार्थ मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. जिनपिंग यांच्या या भेटीदरम्यान हॉटेलातील काही ईशान्येकडील कर्मचाऱ्यांना जिनपिंग यांच्यासमोर न येण्याची ताकीद देण्यात आली होती तर एका मॉलमधील कर्मचाऱ्यांना तर सुटी देण्यात आली होती.
ईशान्येकडील नागरिकांमध्ये या प्रकाराची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकारांची गंभीर दखल घेत झाल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आयबीला दिले. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी या प्रकाराबद्दल जळजळीत प्रतिक्रिया नोंदवली आहे. ईशान्य भारतीयांचा हा अपमान असून आमच्या देशभक्तीवर कायमच
संशय घेतला जातो. आम्ही भारतीय म्हणून जगू शकत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.